शाळा गजानन विद्यालय पाटला ७५ वर्ष पूर्ण झाली. अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करताना मागिल इतिहास जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे. त्यावेळच्या योगदानावरच आजची वैभवशाली व गौरवशाली शाळा उभी आहे.
मान. श्री. संजय देसाई यांचे आजोबा कै. विनायक गंगाराम देसाई हे त्यावेळचे इंग्रजी ७ वी पास असे शिक्षीत होते. आपल्या सारखं सर्वांनी शिकावं या संकल्पनेतून ते देसाई वाड्यातील आजुबाजुच्या शिक्षणोत्सुक मुलांना शिकवित असत.
सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे या ध्यासातून देसाई वाड्यातील तत्कालीन देसाई कुटुंबियांनी प्राथमिक शाळा सुरु करण्यासाठी प्रयत्न केले. शाळा सुरु करण्यासाठी पहिली आवश्यकता होती अर्थातच जागेची. यासाठी मान. श्री. संजय देसाई यांची चुलत काकी कै. गं. भा. सरस्वती गजानन देसाई पुढे सरसावली. तिने स्वतःचे घर, शाळा सुरू करण्यासाठी उपलब्ध करून दिले. सर्व प्रथम पहिली, नंतर दुसरी असे वर्ग सुरु झाले. या शाळेत प्रथम शिकविण्याचा मान. कै. कृष्णाजी जळवी अर्थात आपले जळवी गुरुजी व कै. सदाशिव गावडे यांना जातो. त्यांना मदतीसाठी मुलांना शिकवायला कै. द. शां. करंदीकर अर्थात दत्तु भटजी असत.
शाळेची व्याप्ती वाढल्यामुळे स्वतंत्र शाळा असावी ही संकल्पना जोर धरू लागली. म्हणून मान.श्री. संजय देसाई यांचे आजोबा कै. विनायक गंगाराम देसाई यांनी आपल्या कोचरेकर यांच्याकडे असलेल्या जमिनीपैकी शाळेला आवश्यक जमीन देवून शाळेची इमारत उभी राहावी म्हणून योगदान दिले. यथावकाश जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शाळा उभी राहिली. कै. गं. भा. सरस्वती गजानन देसाई यांचे शाळेप्रती असलेले योगदान लक्षात घेता त्यांचे यजमान कै. गजानन देसाई यांचे नाव शाळेला देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शाळेचे नाव गजानन विद्यालय झाले.