“आजन्म मी स्मरेन ही थोर माझी शाळा, विद्या शिकावयाला आरंभ येथे केला.”
शाळा गजानन विद्यालय पाटला ७५ वर्ष पूर्ण झाली. अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करताना मागिल इतिहास जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे. त्यावेळच्या योगदानावरच आजची वैभवशाली व गौरवशाली शाळा उभी आहे.
मान. श्री. संजय देसाई यांचे आजोबा कै. विनायक गंगाराम देसाई हे त्यावेळचे इंग्रजी ७ वी पास असे शिक्षीत होते. आपल्या सारखं सर्वांनी शिकावं या संकल्पनेतून ते देसाई वाड्यातील आजुबाजुच्या शिक्षणोत्सुक मुलांना शिकवित असत.
सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे या ध्यासातून देसाई वाड्यातील तत्कालीन देसाई कुटुंबियांनी प्राथमिक शाळा सुरु करण्यासाठी प्रयत्न केले. शाळा सुरु करण्यासाठी पहिली आवश्यकता होती अर्थातच जागेची. यासाठी मान. श्री. संजय देसाई यांची चुलत काकी कै. गं. भा. सरस्वती गजानन देसाई पुढे सरसावली. तिने स्वतःचे घर, शाळा सुरू करण्यासाठी उपलब्ध करून दिले. सर्व प्रथम पहिली, नंतर दुसरी असे वर्ग सुरु झाले. या शाळेत प्रथम शिकविण्याचा मान. कै. कृष्णाजी जळवी अर्थात आपले जळवी गुरुजी व कै. सदाशिव गावडे यांना जातो. त्यांना मदतीसाठी मुलांना शिकवायला कै. द. शां. करंदीकर अर्थात दत्तु भटजी असत.
शाळेची व्याप्ती वाढल्यामुळे स्वतंत्र शाळा असावी ही संकल्पना जोर धरू लागली. म्हणून मान.श्री. संजय देसाई यांचे आजोबा कै. विनायक गंगाराम देसाई यांनी आपल्या कोचरेकर यांच्याकडे असलेल्या जमिनीपैकी शाळेला आवश्यक जमीन देवून शाळेची इमारत उभी राहावी म्हणून योगदान दिले. यथावकाश जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शाळा उभी राहिली. कै. गं. भा. सरस्वती गजानन देसाई यांचे शाळेप्रती असलेले योगदान लक्षात घेता त्यांचे यजमान कै. गजानन देसाई यांचे नाव शाळेला देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शाळेचे नाव गजानन विद्यालय असे झाले.
|| इवलेसे रोप लावियले दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी ||
या उक्ती प्रमाणे देसाई कुंटुंबीयांनी लावलेले हे रोपटे आज वटवृक्ष झाले आहे. दि. ४ एप्रिल २०२५ ला ७५ वर्ष पूर्ण होत असून या अमृत महोत्सवी वर्षाचा शुभारंभ कार्यक्रम घडवून आणला अमृतमहोत्सव कमिटी, सर्व पालक व माजी विद्यार्थी यांनी. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले भगिरथ प्रतिष्ठान, झारापचे संस्थापक मान. श्री. प्रसादजी देवधर, जिव्हाळा सेवाश्रम, माडयाची वाडी चे संस्थापक मान. श्री. सुरेशजी बिर्जे व अध्यक्ष म्हणून उपस्थित पाट गावचे उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते मान. श्री. मंदार प्रभू , पाट गावच्या प्रथम नागरीक मान. सौ. साधना परब, सामाजिक कार्यकर्ते मान. श्री. समीर धुरी, रोटरी क्लब मेंबर तसेच पेशाने डॉक्टर असलेले शाळांना सहकार्य करणारे व याच शाळेचे माजी विद्यार्थी मा. रविंद्र जोशी, वेळकर फाउंडेशन मुंबईचे अध्यक्ष तसेच शाळा गजानन विद्यालय पाटच्या मुलांना मोफत कराटे प्रशिक्षण चे प्रणेते मान. श्री. बाळा वेळकर, मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लावणाऱ्या स्मार्ट माता, ज्यांनी कुडाळ तालुका प्रतिनिधित्व भुषविले त्या श्रीम. गायत्री राऊळ या सर्वांचे सत्कार करण्यात आले.
तसेच शाळेसाठी योगदान देणाऱ्या सर्व दात्यांचे व माजी विद्यार्थी यांचे स्वागत तसेच सत्कार करण्यात आले.
हा कार्यक्रम अमृत महोत्सव समिती, शाळा व्यवस्थापन समिती, सर्व शिक्षक, पालक, आजी – माजी विद्यार्थी यांच्या मोलाच्या योगदानातून यशस्वी झाला.